Pankaja Munde on BJP: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता पंकजा मुंडे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्यासमोर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला आहे. तसंच आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या असंही म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यादरम्यान मंचावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी यावेळी भाषण करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. 


"बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या," असं आवाहन करत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. पंकजा मुंडे यांनी महाभारताच्या युद्धातील अर्जुन आणि कर्ण यांच्या रथाचे उदाहरण देत थेट पक्षश्रेष्टींवर निशाणा साधला. आता पंकजा मुंडेंच्या भाषणातील कर्ण आणि अर्जुन कोण यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 


"जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी जिल्ह्याच्या मातीतील माणूस लागतो. बाहेरच्या लोकांनी जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा फरक पडतो, सत्तेतील मंत्र्यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावं, अशी अपेक्षा आहे. आज माझ्याकडे कोणतंही पद नाही. आमचा सुखाचा संसार चालू द्या, आम्ही लोक मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो,' असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.


पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न


"पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपामध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारं एक युनिट आहे. तेच हे काम करत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे," असं मोठं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.