यवतमाळ : भाजपने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी आणि जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर यवतमाळच्या वणी येथे ‘डिग्री जलाओ’आंदोलन करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यातील १९ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. यापैकी २ लाख ५९ हजार पदे पाच वर्षात न भरल्यामुळे नेहमीसाठी निरस्त झाली आहेत. पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. 


आता तर पुन्हा ३० टक्के नोकरीची पदे कमी केली जाणार आहेत. सरकारचे असेच धोरण राहिले तर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी त्यांच्या डिग्रीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांनी रस्त्यावर उतरून डिग्रीची होळी करून दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारला.