BJP Slams Amit Thackeray: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. सिन्नरमधील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार थांबवल्याने टोलनाका फोडल्याच्या विषयावरुन भाजपाने टीका केली आहे. भाजपाने संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करत, "कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत," असं म्हणत अमित ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. दादागिरी भाजपा सरकार चालू देणार नाही, असं म्हणत अमित ठाकरेंसाठी झालेल्या टोलनाका तोडफोड प्रकरणावरुन महाराष्ट्र भाजपाने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.


हिंमत असेल तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संपूर्ण घटनाक्रम सांगणारा एक व्हॉइसओव्हरही वापरण्यात आला आहे. अमित ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, सिन्नरमधील टोलनाका फोडतानाची दृष्य, या टोलनाका तोडफोडीवर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंचा फोटो अशा अनेक गोष्टी या 2 मिनिटं 20 सेकंदांच्या व्हिडीओत दिसत आहे. "अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा," अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ भाजपाने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या थम्बनेलला अमित ठाकरेंचा विचार करतानाचा फोटो, बॅकग्राउण्डला टोलनाक्याची तोडफोड झाल्याचा फोटो वापरण्यात आला आहे. या फोटोवर 'फोडणं सोपं आहे हिंमत असेल तर बांधून दाखवा,' असं वाक्य लिहिलेलं आहे.


चेहऱ्यावरचा आसुरी आनंद


या व्हिडीओला देण्यात आलेल्या व्हॉइसओव्हरमधून भाजपाने, "राज ठाकरे आणि टोलनाका यांचं तसं जुनं आणि घट्ट नातं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला चांगलच ठाऊक आहे. त्यात खुद्द राज ठाकरे यांच्या सुपुत्राची म्हणजे अमित ठाकरेंची गाडी समुद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नरच्या टोल नाक्यावर तब्बल 3 ते साडेतीन मिनिटं थांबवली. त्या टोलनाक्यावर फास्टटॅगसंदर्भात काही तांत्रिक अडचण असल्याने गाड्या थांबवण्यात येत होत्या. म्हणूनच अमित ठाकरेंची गाडीही थांबवली. आता अमित ठाकरेंची गाडी थांबवली म्हणून मनसेचे कार्यकर्ते भलतेच भडकले आणि त्यांनी थेट टोलनाक्याचीच तोडफोड केली. यासंबंधी जेव्हा अमित ठाकरेंना समजलं त्यावेळी त्यांना चेहऱ्यावरचा आसुरी आनंद लपवता आला नाही," असं म्हणत टीका केली आहे.



कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे..


"माध्यमांशी बोलताना तर त्यांनी खोटं विधानही केलं की त्यांना टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी 10 मिनिटं थांबवलं. पण अमितसाहेब 3-3.30 मिनिटं थांबवण्याला तुम्ही 10 मिनिटं थांबवलं सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना हे करण्यासाठी भाग पाडलं आणि टोलनाका फोडायला सांगितलं. स्वत:चं कर्तव्य बजावत विचारपूस करणं ही त्या टोलनाका कर्मचाऱ्यांची चूक नक्कीच नव्हती. पण तुमच्या मनसे कार्यकर्त्यांचा अततायीपणा त्यांनाच भोवला. लक्षात ठेवा हे सरकार जन सामान्यांचं सरकार आहे. कोणा एका नेत्यासाठी किंवा त्याच्या मुलासाठी इथे वेगळे नियम पाळले जाणार नाहीत. तसं केलं तर महाराष्ट्राच्या जनतेची आणि प्रामाणिकपणे टोल भरणाऱ्या प्रत्येकाची प्रतारणा होईल. ते आम्हाला मान्य नाही. म्हणूनच तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन अटक केलं. जेव्हा अमित ठाकरेंना माध्यमांनी याबद्दल विचारलं तेव्हा टोलनाक्यारील मॅनेजरसह कर्मचारी त्यांच्याशी उद्धट भाषेत त्यांच्याशी बोलले, असा दावा अमित ठाकरेंनी केला. त्याचबरोबर ते हे सुद्धा म्हणाले की, राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. आता त्यात माझ्यामुळे आणखी एकाची भर पडली. पण अमित ठाकरे हा टोलनाका बंद पडला नाही. तुम्ही नियमाप्रमाणे टोलही भरला नाही. पण दादागिरी भाजपा सरकार चालू देणार नाही," असा इशाराही या व्हिडीओमधून भाजपाने दिला आहे.



मागील काही काळामध्ये भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्याचं दिसून आलं होतं. मात्र अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये टीका केली होती.