मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मतदारांना खूश करण्यासाठी १० रुपयांमध्ये थाळी देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र अटल आहार योजना सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बांधकाम कामगारांसाठी ही योजना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. त्याची व्याप्ती राज्यभर वाढवली जाणार आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या भाजपच्या संकल्पपत्रात आणखी कोणत्या आश्वासनांचा पाऊस पाडणार याकडे लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी अनेक घोषणा केल्या होत्या. त्यानंतर वचननाम्यात देखील शिवसेनेने अनेक गोष्टींची घोषणा केली आहे. शिवसेनेने १० रुपयांमध्ये थाळीची घोषणा केली आहे. पण भाजप पाच रुपयांमध्ये भोजन देण्याची घोषणा करु शकते. 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. युती झाली असली तरी शिवसेना आणि भाजपने वेगवेगळे जाहीरनामे प्रकाशित केले आहेत.


भाजपने महाराष्ट्र अटल आहार योजना ७ मार्च २०१९ रोजी नागपूर येथे सुरू केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आता या योजनेला महाराष्ट्र भरात आणखी व्यापक रुप देण्याचा विचार करत आहे.