Chandrashekhar Bavankule on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavanukule) यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस असत्य बोलून कधीच राजकारण करत नाहीत असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण खुलासा केला आहे. मागच्या 28-30 वर्षांपासून देवेंद्र फडणवीसांना आपण ओळखतो. ते असत्य बोलून कधीच राजकारण करत नाहीत. षडयंत्र करून, पाठीत खंजीर खुपसून, खोटे बोलून सत्ता मिळवणे त्यांच्या रक्तात नाही. पद मिळाले नाही तरी चालेल. ते खोटं बोलून मोठे झाले नाहीत. त्यांच्यावर गंगाधर फडणवीस यांचे संस्कार आहेत. आणि सस्वयंसेवक म्हणून ते चुकीचा मार्ग निवडू शकत नाही. जे घडलं असेल तेच त्यांनी इमानदारीनी सांगितलं असेल," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.


संजय राऊतांवर टीका - 



"संजय राऊतांवर महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केलं आहे. संजय राऊत हे जेलमध्ये गेल्यापासून शिवराळ भाषेत बोलणं सुरू केलं आहे. त्यांना देवेंद्रजी कळलेच नाहीत. संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर बोलण्याइतकी त्यांची उंची नाही. संजय राऊत हेही षडयंत्राचा भाग असू शकतील," अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. 


"आम्हाला कळत होते की मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर त्यांनी आमदार निवडून आणले. षडयंत्र एका दिवसात होत नाही. यामागे टीम आहे.  त्या टीममध्ये शरद पवार ,उद्धव ठाकरे, संजय राऊत असतील. त्यांनी टीम वर्क म्हणून काम केले," असा प्रत्यारोप त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार नैसर्गिकरित्या पडले आहे. परमेश्वराने न्याय दिला असून 
देवेंद्र आणि शिंदे सरकार येणे ही तर श्रींची इच्छा," असंही ते म्हणाले. 



"अनिल देशमुख खोटं बोलत आहेत. त्यांना कुठे प्रस्ताव होता. मी तोंड उघडलं तर अनिल देशमुख यांना उत्तर देता येणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर काय झालं होतं हे जर मी बोललो तर देशमुखांचे पाय खाली जतील, ते अडचणीत येतील. देशमुखांनी किमान फोकनाडबाजी बंद करावी. देशमुख आता जामीनावर बाहेर आहेत. त्या नियमानुसार त्यांनी राहिले पाहिले. त्यांना क्लीन चिट नाही मिळालेली नाही," असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे. 



अमित शाह दौरा



अमित शाह 17 तारखेला उशिरा नागपुरात येणार आहेत. त्यानंतर ते 18 तारखेला दीक्षाभूमी आणि रेशीमबागला ही जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.