`सत्तेत येण्यासाठी भाजप पुन्हा करणार गोधरा कांड` विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान
जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावा केलाय.
आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) यांनी धक्कादायक विधान केलं आहे. अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाज (BJP) सत्तेवर येण्याची शक्यता असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देशात दंगलींचं सत्र सुरू झाले असून धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर सत्तेत येण्याचा भाजपचा इतिहास असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. आपण आपला माहितीचा स्त्रोत उघड करणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात राजकीय बदल होणार
15-20 दिवसात म्हणजे सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा बदल होईल असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवलंय. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल असंही वडेट्टीवार म्हणालेत. महाराष्टाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. मुख्यमंत्री स्नेहभोजणाचं आमंत्रण देतात, पण उपमुख्यमंत्री गैरहजर राहतात, यावरुन महाराष्ट्रात सर्वकाही आलबेल नसल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर शिंदेच मुख्यमंत्री आहेत आणि राहतील असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.
दरम्यान, कर्नाटकातल्या बागलकोट इथला शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत होता म्हणून हटवला असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केलीय. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीची धास्ती घेतलीय, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मुंबईतल्या इंडियाच्या बैठकीमुळेही अनेकांना धास्ती वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला..
दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामने यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यापासून काहीही टीका करत आहेत. आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्याकडे 25 वर्ष विरोधी पक्षनेतेपद राहावं, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.