नागपूर : १ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. मात्र वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थक हा दिवस अन्यायाचा दिवस म्हणून पाळतात. नागपूर आणि चंद्रपुरातील विदर्भवाद्यांनी देखील आज वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरण्याचा संकल्प प्रयत्न केला. नागपुरात श्रीहरी अणेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शासकीय ध्वजारोहणात विदर्भवादी गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेता, १० जणांना ताब्यात घेण्यात आलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालय परिसरात विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भ राज्याचा निर्धार व्यक्त केला. 


या वेळी उपस्थित लोकांना वेगळ्या विदर्भाची शपथ देण्यात आली. विकासाबाबत सतत अन्याय झालेल्या विदर्भाचा अनुशेष केवळ वेगळे राज्य निर्माण करून होऊ शकतो अशी भावना याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली. 


राज्य स्थापनेचा वर्धापन दिन 


दिल्लीचे तख्त राखणाऱ्या अखंड महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिवस... भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापन दिन... हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली.


शिवाजी पार्कवर आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंसह राज्याचे सगळे बडे सनदी आणि पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई पोलिसांनी विशेष संचलन करून राज्यपालांना मानवंदना दिली.