धक्कादायक, एका घरातून शेकडो कोरी मतदान ओळखपत्र पोलिसांनी केली जप्त
एका घरात शेकडो कोरी मतदान ओळखपत्र (Blank voter card) सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
कल्याण, ठाणे : एका घरात शेकडो कोरी मतदान ओळखपत्र (Blank voter card) सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही सापडलेली शेकडो मतदान ओळखपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. दरम्यान, एकाच व्यक्तीच्या घरात एवढी कोरी मतदान ओळखपत्र सापडल्याने संशय व्यक्त होत आहे. यापैकी कोणाला मतदान ओळखपत्र देण्यात आली आहेत का, याचीही पोलीस चौकशी करत आहेत. (Blank voting card found in a house in Kalyan, action taken by police)
कल्याणातील एका व्यक्तीच्या घरात तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत एकदोन नव्हे तर 400 ते 500 कोरी मतदान ओळखपत्र सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित इसम कामेश मोरे यांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या अटकेनंतर ही कार्ड कुठून आणली याचा उलगडा होऊ शकणार आहे.
कल्याण पश्चिमेकडील माधव संसार गृहसंकुलातील एक प्लॅट कामेश मोरे यांच्या नावावर आहे. पती - पत्नीमध्ये वाद असल्याने या घरात त्यांची पत्नी आणि मुले राहतात. दोन दिवसापूर्वी कामेश यांनी आपल्या मुलाना आपली कागदपत्र घेण्यासाठी येत असून आपल्या कपाटातून कागदपत्र काढून ठेवण्यासाठी फोन केला होता. यानंतर त्यांच्या पत्नीने त्याचे कपाट उघडले असता तिला कपाटात शेकडो मतदान ओळखपत्र सापडली. मात्र ही ओळखपत्र कोरी असून या ओळखपत्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात येताच तिने या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांना संपर्क करत माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार यांनी पथक घटनास्थळी पाठवले. त्यांना कपाटातील कागदामध्ये कोरी मतदान ओळखपत्र आणि राजकीय पक्षाचे नोंदणी फॉर्म सापडले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणायत आला असून याप्रकरणाची खडकपाडा पोलिसांकडून तपास सुरु केला आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.