Salary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती. या अनुषंगाने पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांची संघटनेसोबत (मार्ड) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीतून समाधानकारक तोडगा निघाल्याने प्रस्तावित संप मागे घेत असल्याचे मार्ड ने जाहीर केले आहे.


22 जुलेैला संपाची हाक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्ड ही राज्यातील सर्व सरकारी आणि महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेच्या वतीने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्‍युत्‍तर निवासी विद्यार्थ्‍यांनी 22 जुलेैला संपाची हाक दिली होती. पगारामध्‍ये वाढ, वसतिगृहामध्ये (हॉस्टेल) अधिक चांगल्‍या सुविधा, तसेच इतर काही मागण्‍यांसाठी त्‍यांनी संपाचा इशारा दिला होता.


बैठकीत झालेल्‍या चर्चेमुळे निर्णय


या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मार्ड समवेत बैठक पार पडली. उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कु-हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्व अधिष्‍ठाता देखील यावेळी उपस्थित होते. बैठकीत झालेल्‍या चर्चेमुळे सदर संप मागे घेण्‍याचे मार्डच्‍या सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्‍य केले. 


 रुग्‍णांची गैरसोय टळणार 


पदव्युत्तर निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मासिक वेतनात शासकीय महाविद्यालयातील वि‍द्यार्थ्‍यांप्रमाणे वेतन देण्‍याचे व महागाई भत्‍त्‍यात वाढ देण्‍याचे तसेच गत ५ महिन्‍याची थकबाकी ही 10 ऑगस्‍टपर्यंत देण्‍याचे महानगरपालिका प्रशासनाने मान्‍य केले आहे. त्यानंतर संप मागे घेण्याचे या विद्यार्थ्यांनी मान्य केले. परिणामी रुग्‍णांची गैरसोय टळणार आहे.