`अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही`; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह
Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.
Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: अमेरिकेतील मोंटेना येथील ग्लॅशिअर नॅशनल पार्कमध्ये वाहून गेलेल्या भारतीय तरुणाचा मृतदेह जवळपास महिन्याभरानंतर सापडला आहे. या नॅशनल पार्कमधील कर्मचारी मागील महिन्याभरापासून या भारतीयाचा शोध घेत होते. अखेर रविवारी हा शोध संपला जेव्हा सिद्धांत पाटीलचा मृतदेह कर्मचाऱ्यांना सापडला. सिद्धार्थ हा मुळचा महराष्ट्रातील आहे.
नेमकं घडलं काय?
सिद्धार्थ कॅलिफॉर्नियामध्ये काम करायचा. तो 6 जुलै रोजी एव्हलान्च लेकजवळ ट्रेकसाठी गेला होता. ॲव्हलांच क्रीक येथे ट्रेकदरम्यान एका मोठ्या दगडावर उभा असताना तो जाऊन तो थेट दरीमधील नदीच्या प्रवाहामध्ये कोसळला. सिद्धार्थच्या मित्रांना तो खाली पडल्यानंतरही दिसत होता. सिद्धार्थ पाण्यात पडल्यानंतर एकदा पाण्यातून वर आला मात्र नदीच्या काठावर पोहचण्याआधीच वेगवान प्रवाहामुळे तो वाहून गेला. सिद्धार्थचे मामा प्रितेश चौधरी यांनी नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
ग्लॅशिअर नॅशनल पार्कने जारी केलं पत्रक
"अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या शोध मोहिमेमध्ये ग्लॅशिअर नॅशनल पार्कमधील कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार त्यांना सिद्धांत नावाच्या 26 वर्षीय भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. सिद्धार्थ 6 जुलै 2024 रोजी ॲव्हलांच क्रीक येथे उंचावरुन नदी प्रवाहात पडून वाहून गेला होता," असं ग्लॅशिअर नॅशनल पार्कने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
कसा सापडला मृतदेह?
"सिद्धांतने ज्याप्रकारचे कपडे आणि ट्रेकिंग गेअर परिधान केलं होतं त्या साऱ्या गोष्टी सापडल्या आहेत. शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता काही पर्यटकांना नदीमध्ये मृतदेह दिसून आला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने तिथे धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतल्या. डीएनए चाचण्या आणि दातांच्या रचनेच्या आधारे आता हा मृतदेह सिद्धांतचाच आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासलं जाणार आहे," असं ग्लॅशिअर नॅशनल पार्कने पत्रकात म्हटल्याचं एएनआयने सांगितलं आहे.
फडणवीसांनी व्यक्त केला शोक
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सिद्धांतच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे. "माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सिध्दांत विठ्ठल पाटील या तरुणाच्या दुःखद निधनाबद्दल ऐकून फार वाईट वाटले. कॅलिफोर्नियातील ॲव्हलांच क्रीक येथे हायकिंग करताना सिद्धांत बेपत्ता झाला. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अथक प्रयत्न केल्यानंतरही त्याला वाचवू शकलो नाही. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. देव त्यांना अशा कठीण काळात शक्ती देवो.", असं फडणवीस यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
राज्यपालांनाही केलेली मागणी
महाराष्ट्राच्या राज्यपालांना सिद्धांत बेपत्ता झाल्यानंतर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मध्यस्थी करुन अमेरिकी अधिकाऱ्यांना सिद्धांतचा मृतदेह शोधण्यासाठी गळ घालण्याची मागणी केली होती.