औरंगाबाद : रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने तब्बल अडीच किलोमीटरपर्यंत मृतदेह हातात उचलून आणावे लागल्याची घटना औरंगाबादच्या सिल्लोडच्या डोंगरगाव शिवारात घडली आहे. सोमवारी या परिसरातील विहिरीत मायलेकीचा मृतदेह आढळले. मृतदेह वर काढण्यासाठीची यंत्रणा तर पोलिसांकडे नव्हतीच पण रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात पोलिसांनी असमर्थता दर्शवल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. अखेर अडीच किलोमीटर मृतदेह नेल्यानंतर तासाभराच्या प्रतिक्षेनंतर रुग्णवाहिका आली. दरम्यान तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मायलेकींवर अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेपत्ता झालेल्या मायलेकींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांजवळ यंत्रणा नव्हती, त्यात गावकऱ्यांनीच मृतदेह बाहेर काढले, मात्र मृतदेह नेण्यासाठी पोलिसांची गाडी अथवा रुग्णवाहिका सुद्धा पोलिसांनी उपलब्ध केली नाही, उलट हे मृतदेह सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पोहचवा, असे आम्हालाच सांगण्यात आले, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.


रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका बाजेवर दोन्ही मृतदेह टाकून अडीच किलोमीटर मृतदेह गावकऱ्यांनी उचलून आणले, त्यानंतर तासभर वाट पाहिल्यावर अखेर रुग्णवाहिका आली. नातवाईकांनी या प्रकारचा एक व्हिडिओ चित्रित केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या मायलेकी बेपत्ता होत्या. सोमवारी विहिरीत त्यांचे मृतदेह आढळलेत. ही आत्महत्या नव्हे तर अत्याचार करून खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराला गंभीर वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.