जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याच जालना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जालना जिल्ह्यात तब्बल 103 डॉक्टर्स बोगस निघाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री राजेश टोपे यांच्याच आदेशावरून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सुरू केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत 103 डॉक्टरांनी आरोग्य विभागाकडे नोंदणी न करताच बोगस दवाखाने थाटून प्रॅक्टिस सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात जोरदार खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश देऊन कारवाई करण्याची सूचना केली होती.


त्यानंतर उशिरा जाग आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 103 डॉक्टर्स बोगस निघाले असल्याची माहिती खुद्द जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत 267 डॉक्टर्स असून नोंदणी न झालेल्या डॉक्टरांची संख्या 166 इतकी आहे.


जालना तालुक्यात सर्वाधिक 25 डॉक्टर बोगस आहेत .तर त्या पाठोपाठ भोकरदनमध्ये 24, जाफ्राबादमध्ये 17, बदनापूरमध्ये 10, घनसावंगीत 9, परतूरमध्ये 8, अंबडमध्ये 6, मंठ्यात 4 डॉक्टर बोगस सापडले आहेत. जिल्ह्यात इतके डॉक्टर बोगस असताना आतापर्यंत आरोग्य यंत्रणा काय करत होती, की या बोगस डॉक्टरांची आरोग्य विभागासोबत मिलीभगत आहे असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.