पुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेज; डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा
पुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेजचा पर्दाफाश. आयुश विभागाकडून ओरॅकल इन्स्टिट्यूट सील करण्यात आले आहे.
Pune Medical College : विद्येच्या माहेरघरात अर्थात पुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेज सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्य शासनाच्या आयुष विभागानं आता हे बोगस मेडिकल कॉलेज सील केलं असून संचालकावर हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओरॅकल इन्स्टिट्यूट असं या बोगस मेडिकल कॉलेजचं नाव आहे.
नॅचरोपॅथीच्या नावाखाली सुनील चव्हाण नावाच्या व्यक्तीनं हे बोगस मेडिकल कॉलेज सुरू केलं होतं. याठिकाणी संस्था चालकांनी लाखो रुपये फी उकळून विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याची बाब समोर आलीय.. यामुळं डॉक्टर बनण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय.
झी 24 तासने बनावट डिग्री रॅकेट उघडकीस आणले होते. या प्रकरणी चार्जशीट दाखल झालीय...संभाजीनगरच्या इम्रान सय्यदने राज्यभरात तब्बल 2700 बनावट डिग्री वाटल्या होत्या...हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर एजंटसह मुख्य आरोपीला अटक करण्यात आली...या टोळीने सर्टिफिकेट 50 ते 60 हजारात विकली होती..
कॉलेजला प्रवेश घेतला तर ते पात्र आहे अपात्र याची चाचपणी करून घ्या. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं वर्ष 2023-24 या सत्रात प्रवेशासाठी 33 कॉलेजेस अपात्र ठरवलीयत. चार जिल्ह्यांतील बीएड, बीपीएड आणि विधी शाखेची ही महाविद्यालयं आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी हा निर्णय घेतलाय. मान्यताप्राप्त प्राचार्य, शिक्षक, पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत या 33 कॉलेजेसवर बंदी घालण्यात आलीय.