मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी! पोलिसांना फोनवर म्हणाला, 24 जूनला स्फोट घडवणार..
Mumbai Pune Bomb Blast Threat: मुंबई आणि पुण्यामध्ये 24 तारखेला स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून यासाठी आपल्याला 2 कोटी रुपये मिळाल्याचा दावा फोन करणाऱ्याने केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
Marathi Breaking News: मुंबई, पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी अज्ञातांकडून देण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता मुंबईमधील पोलीस कंट्रोल रुमला हा धमकीचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूरमधून हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच स्फोट थांबवण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
साडेसहाला स्फोट घडवण्याची धमकी
अंबोली पोलीस स्टेशनमध्ये हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या व्यक्तींने मला 2 लाख रुपये पाठवून द्या. मला 2 लाख रुपये पाठवले तरच हा बॉम्बस्फोट थांबवता येईल असं धमकावणाऱ्याने सांगितलं. या फोन कॉलनंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "कॉल करणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोल रुमला कॉल केला होता. 24 जून रोजी संध्याकाळी 6.30 मिनिटांनी मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला परिसरामध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत, असा दावा केला" अशी माहिती दिली आहे.
पुण्याचाही केला उल्लेख
तसेच, "पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत. मी स्वत: बॉम्बस्फोट घडवून आणत आहे असा दावाही या कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला. मला यासाठी 2 कोटी रुपये मिळेत असंही तो म्हणाला. मात्र मला 2 लाख रुपये मिळाल्यास मी माझ्या माणसांबरोबर मलेशियाला जाईन, असं कॉल करणाऱ्याने सांगितलं," अशी माहिती सुत्रांनी दिली. या प्रकरणामध्ये अंबोली पोलिसांनी आयपीसी कलम 505(1)(बी), 505(2) आणि 185 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता हा फोन उत्तर प्रदेशमधील जौनपुरमधून आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरु केला असून उत्तर प्रदेश पोलिसांना यासंदर्भात संपर्क साधण्यात आल्याचं समजतं.
हायजॅकिंग प्लॅनसंदर्भात एकाला अटक
दरम्यान, कालच मुंबईमध्ये मुंबई-दिल्ली विमानात विमान हायजॅक करण्यासंदर्भात फोनवर गप्पा मारत असलेल्या तरुणाला अटक केली आहे. मूळचा हरियाणाचा असलेला हा तरुण अज्ञात व्यक्तीशी, "अहमबादचे फ्लाइट निघणार आहे. काही समस्या असल्यास मला कॉल कर. हायजॅकींगचं संपूर्ण प्लॅनिंग झालं आहे. चिंता करु नकोस," असं सांगत होता. या कॉलवरुन त्याने विमानामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत त्याला सहार पोलिसांनी अटक केली आहे.