अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने लैंगिक संबंध हा बलात्कार आहे आणि अशा कृत्याला कायदेशीर संरक्षण कायद्यानुसार स्वीकारले जाऊ शकत नाही असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पतीला सुनावण्यात आलेली 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. पत्नीने पतीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारीरिक संबंधासाठी संमतीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्याचं अधोरेखित करताना न्यायमूर्ती जी.ए. सानप यांच्या खंडपीठाने सांगितलं की, “18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवणं हा बलात्कार आहे. मग ती विवाहित आहे की नाही हे महत्त्वाचं नाही".


हायकोर्टाने यावेळी सांगितलं की, "जेव्हा पत्नी किंवा मुलीचं वय 18 पेक्षा कमी असतं तेव्हा संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा बचाव करता येणार नाही”. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून, नागपूर खंडपीठाने ती कायम ठेवली आहे. 


प्रकरणाच्या तपशिलानुसार, आरोपीने तक्रारदाराशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे गर्भधारणा झाली. नंतर त्याने तिच्याशी लग्न केले. मात्र, त्यांचे वैवाहिक संबंध बिघडले आणि महिलेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.


"त्यांच्यात तथाकथित विवाह झाला होता, असे जरी तर्काच्या निमित्ताने गृहीत धरले गेले तरी, पीडितेने केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने हा लैंगिक संबंध तिच्या संमतीविरुद्ध होता, त्यामुळे तो बलात्कारच ठरेल," असं हायकोर्टाने म्हटलं आहे. आरोपी पीडितेची शेजारी होता, जेव्हा ती महाराष्ट्रातील वर्धा येथे राहात होती. तरुणी तिथे वडील, बहिणी आणि आजीसोबत राहत होती.


आरोपी आणि पीडित तरुणी 3 ते 4 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. पण तरुणी यादरम्यान शारीरिक संबंधांची मागणी फेटाळत होती. दरम्यान कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने पीडित तरुणी शेजारच्या शहरात कामासाठी गेली. आरोपीने तिथेही तिचा पाठलाग केला. यादरम्यान तो तिला कामावर सोडण्याची ऑफर देत असे. त्यातच त्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं, ज्यामुळे ती गर्भवती झाली. 


सुरुवातीला, आरोपीने पीडितेशी लग्न करण्याचे वचन दिलं. आरोपांनुसार, काही शेजाऱ्यांच्या उपस्थितीत भाड्याच्या खोलीत विवाह समारंभ आयोजित केला. पण नंतर त्याच्या वागण्यात बदल झाला आणि छळ करु लागला. यामध्ये शारीरिक हल्ले आणि गर्भपात करण्याचा दबाव समाविष्ट होता. नंतर त्याने पितृत्व नाकारले आणि तिच्यावर दुसऱ्या पुरुषापासून मूल झाल्याचा आरोप केला.


छळ असह्य झाल्यानंतर मे 2019 मध्ये पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या. आपल्या बचालात, आरोपीने दावा केला की लैंगिक संबंध सहमतीने होते आणि ती त्याची पत्नी होती. तथापि, न्यायमूर्ती सानप यांनी निरीक्षण नोंदवलं की, "माझ्या मते, गुन्हा सिद्ध होण्यासाठी एकापेक्षा अनेक कारणं आहेत. फिर्यादीने हे सिद्ध केले आहे की गुन्हा घडला तेव्हा पीडितेचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं". डीएनए अहवालातून आरोपी आणि पीडिताच मुलाचे पालक असल्याचं सिद्ध झालं असल्याचीही खंडपीठाने सांगितलं.