धक्कादायक! मुलीशी बोलणं त्याच्या जीवावर बेतलं, व्हिडिओ बनवून मुलाची आत्महत्या
मुलीशी बोलणं त्याला इतकं महागात पडलं की तो जग सोडून गेला
जयेश जगड, झी मीडिया, अकोला : केवळ मुलीशी बोलला या कारणावरुन काही जणांना एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली. यामुळे दुखावलेल्या या मुलाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना अकोल्यात समोर आली आहे.
अक्षय मुदगल असं आत्महत्य केलेल्या मुलाचं नाव असून तो दहावीत शिकत होता. मुलीशी बोलतो म्हणून 26 एप्रिलला काही जणांनी अक्षयला शहरातील दत्त मंदिराजवळ मारहाण केली. त्यावेळी गावातील अनेकजण तिथे उपस्थित होते. सर्वांसमोर मारहाण केल्याने आपला अपमान केल्याची भावना अक्षय मनात आली. यामुळे तो दुखावला गेला.
त्यानंतर अक्षय घरी आला आणि त्याने आपल्या मावसभावाला फोन करुन आत्महत्या करत असल्याचं त्याला सांगितलं. आत्महत्या करण्यापूर्वी अक्षयने एक व्हिडिओ बनवला त्यात तो रडत असून त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आपल्याला मारहाण केल्याने बेइज्जती झाली आता मी आत्महत्या करतोय, माझा अपमान झाला, मला रहावसं वाटत नाही, असं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे. तसंच मला मारलं तेव्हा खूप लोक होते, माझी बदनामी झाली, आता मी चाललोय, कधीच परत येणार नाही, असा व्हिडिओ रेकॉर्ड करत अक्षयने पाचव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली.
अल्पवयीन मुलाच्या जाण्याने त्याचा कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक म्हणजे याप्रकरणी अजून कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. अक्षयच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावं असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.