Buddhist Family Ganpati Statue At Home Navi Mumbai Viral Video: गणपती बसवला म्हणून प्रसिद्ध विनोदी अभिनेते भाऊ कदम यांना काही वर्षांपूर्वी स्वधर्मीयांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. असाच काहीसा प्रकार यंदा नवी मुंबईमधील नेरुळमध्ये घडला आहे. बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केल्यावरुन नेरुळमधील एका चाळीत झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूने युक्तीवाद सुरु असल्याचं चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.


नक्की कुठे घडला हा प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेरुळमधील एका बौद्ध समाजातील कुटुंबाने घरामध्ये 10 दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापणा केली. त्यावर आक्षेप घेण्यासाठी समाजातील काही लोकांनी घरी जाऊन याबद्दल चौकशी केली. यावरुन या घरातील माहिलेबरोबर सामाजातील लोकांशी मतभेद झाले. या दोघांमधील चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


काय आहे व्हिडीओमध्ये?


व्हिडीओमध्ये अशाप्रकारे बौद्ध असूनही घरी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्याला विरोध करणारा एक कार्यकर्ता, 'आमची विनंती आहे की तुम्ही बाळासाहेब आणि बुद्धांना नका ना चवीला घेऊ' असं म्हणताना ऐकू येतं. घरामध्ये गणपती बसवणारी महिला विरोध करण्यासाठी घराच्या दारापर्यंत आलेल्या सामाजातील लोकांना, 'तुम्ही कोणावर जबरदस्ती करु शकत नाही' असं सांगते. त्यावर हे लोक 'का नाही करु शकत?' असा प्रश्न विचारतात. 'प्रेमाने सांगतोय पोरीच्या खुशीसाठी करतोय' असं उत्तर ही महिला या लोकांच्या प्रश्नावर देते. त्यावर समोरुन, 'ओ कसलं पोरीच्या खुशीसाठी फोटो काढा मग भिंतीवरचा,' असं एक महिला उत्तर देताना ऐकू येतं. 


महिला आणि विरोध करणाऱ्यांमध्ये काय संवाद झाला?


'आम्ही सगळे देव धर्म मानतो. आधीची पिढी तशीच होती. बदल करणं आपलं काम आहे ना? बदल एकाने नाही होत सगळीकडून व्हायला पाहिजे,' अशा शब्दांमध्ये ही महिला विरोध करण्यासाठी आलेल्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसते. यावर समोरची व्यक्ती त्यांना विरोध करु लागली, त्यांचं अडनाव विचारु लागली. त्यावर या महिलेने, "मी समजवूनच सांगतेय. यांना माहिती आहे आमचं अडनाव" असंही म्हटल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. "आता आम्ही आमचे कार्यक्रम इथे करणार नाही. गावाला करणार," असं ही महिला विरोध करणाऱ्यांना सांगते. त्यावर विरोध करणारे व्यक्ती, "गावाला पण आम्ही करु देणार नाही," असं सांगते. त्यावर ही महिला, "गाव आमचा आहे आम्ही करु. आम्ही जळगाव जिल्ह्यातले आहोत," असं सांगते. त्यावर विरोध करणारी व्यक्ती मी सुद्धा जळगाव जिल्ह्याचा असल्याचं सांगतो. त्यावर ही महिला, "मी पारोळ्यातली आहे. करतात गावाला," असं ही महिला गणेशोत्सवाबद्दल बोलताना म्हणाली. यावर विरोध करणारी व्यक्ती, "मी काय सांगतो कोण काय करतं त्याच्याशी नाही. आपण जर बाबासाहेबांच्या विचारांचे आहोत असं सांगतोय मी," असं म्हणत आपली बाजू मांडते.


"हिंदू पद्धतीने लग्न लावायचं तुम्ही"


"मी सांगितलं ना मुलीच्या खुशीसाठी आम्ही करतो," असं ही महिला या विरोध करणाऱ्यांना सांगते. त्यावर विरोध करणारी व्यक्ती, "आम्ही विचारलं नाही तुम्ही का करता. करु नका ना," असं हात जोडून सांगते. त्यावर या व्यक्तीचा सहकारी गणपतीची प्रतिष्ठापणा करणाऱ्या महिलेला, "हिंदू पद्धतीने लग्न लावायचं तुम्ही," असा सल्ला देतो. त्यावर ही महिला विरोध करते. ती आपली जात सांगून आम्ही आमच्या पद्धतीनेच लावणार लग्न असं या विरोध करणाऱ्यांना सांगते. बराच वेळ हा वाद सुरु राहतो. ही महिला आपल्या भूमिकेवर कायम राहते. विरोध करणारे या महिलेला इशारा देऊन निघून जातात तेव्हा हा व्हिडीओ संपतो.


तुम्हीच पाहा व्हिडीओ...


भीम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधर नारायण साळवे यांनी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ फेसबुकवरुन शेअर करत असा विरोध करण्याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.



दोन्ही बाजूंच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया


या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर 2 गट पडले असून अनेकांनी ही महिला ज्या पद्धतीने उत्तरं देत आहे ते पाहून तिचं कौतुक केलं आहे. या महिलेचं समर्थन करणाऱ्यांनी व्यक्तीस्वांत्र्याचा उल्लेख करत तिला पाठिंबा दार्शवला आहे. तर दुसरीकडे बौद्ध धर्मीय असून गणपतीची प्रतिष्ठापणा करण्याऱ्या या कुटुंबाला विरोध करण्याची समाजातील लोकांची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्मातील तत्वाच्या आधारा घेत असा चर्चेच्या माध्यमातून विरोध झाला पाहिजे असं म्हटलं आहे.