बुलडाण्यात हात कापणारी एसटी, दोन तरुणांचे हात कापले, प्रकृती गंभीर
एसटी प्रशासनाच्या चुकीमुळे दोन तरुणांना आलं आयुष्यभराचं अपंगत्व
मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : एसटी प्रशासनाच्या (MSRTC) अक्षम्य दुर्लक्षामुळे बुलडाण्यात (Buldana) एक मोठी दुर्घटना घडली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर आगाराच्या (Malkapur ST Depot) मलकापूर ते पिंपळगाव देवी दरम्यान धावणाऱ्या एसटी बसने (ST Bus) आज सकाळी तिघांना उडवलं. या अपघातामध्ये दोन तरुणांचे हात शरीरपासून तुटून पडले. एसटी व्यवस्थापनच्या चुकीमुळे या तरुणांना आयुष्यभराचं अपंगत्व आलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
मलकापूर आगारातून नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाचला एसटी बस पिंपळगाव देवीच्या दिशेने निघाली. आव्हा-उर्हामार्गे पिंपळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या या एसटीच्या टूल बॉक्सचा पत्रा फाटून वर आला होता. त्याच अवस्थेत ती बस धावत होती. पण याचा मोठा फटका तीन तरुणांना बसला. शेतामध्ये जात असताना परमेश्वर सुरडकर यांच्या बाजूने जाणाऱ्या या एसटीच्या तुटलेला पत्रा परमेश्वर यांच्या हाताला घासून गेला आणि यात परमेश्वर यांचा हात तुटून बाजूला पडला.
पण यानंतरही एसटी थांबवण्यात आली नाही. काही अंतरावर सैन्य दलात भरत होण्याची तयारी करणाऱ्या विकास पांडे या तरुणाचा हातही एसटीच्या फाटलेल्या पत्र्यामुळे तुटून पडला. पिंपळी गवळी इथला गणेश पवार हा तरुणही एसटीच्या धडकेत गंभीर जखमी झाला आहे. सलग तीन अपघातांमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एसटी पाठलाग करत एसटी थांबवली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये आणली.
या घटनेमुळे बुलडाण्यात हात कापणाऱ्याची एसटीची प्रचंड दहशत पसरली होती. दरम्यान या अपघाताप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलीय. जखमींना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत अशी माहिती एसटीचे महाव्यवस्थापक शेखर चेन्ने यांनी दिलीय.