बुलढाणा : बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार विद्यार्थ्यांच्या उत्साहाने ओसंडून वाहत होते. मैदानामध्ये जिकडे नजर जाईल तिकडे विद्यार्थ्यांचा ओघ दिसत होता. हिरव्या, पांढर्‍या, काळ्या आणि केशरी रंगातील जर्सी घातलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मैदानातील या मानवी रांगोळीचे दृष्य डोळ्यात टिपण्यासाठी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा उत्साहपूर्ण वातावरणात ५००० विद्यार्थ्यांनी ५ मिनिटे मौन धारण करून, निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारली. आणि एकच आवाज उठला ‘‘भारत माता कि जय…’’


विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसले ते आपण देशात सर्वात मोठ्या मानवी रांगोळीचा भाग झाल्याचे आणि उपस्थितांच्या चेहर्‍यावर दिसले ते या दैदिप्यमान सोहळ्याचे आपण साक्षीदार झाल्याचे. या कार्यक्रमाने बुलढाण्यात एक नवा इतिहास रचला आणि या कार्यक्रमाची नोंद अखेर ‘इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली.


विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाप्रमाणे साकारली. या रांगोळीचर दखल इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने घेतली. त्यांनी संपर्ण रांगोळीचे व्हिडीओ चित्रीकरण केले. 


ही मानवी रांगोळी ५ मिनीटे ठेवून त्यांनी या उपक्रमाची नोंद केली. त्यानंतर निवडणूक आयागोला या उपक्रमाची नोंद घेतले असल्याबद्दलचे प्रमाणपत्र, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.