Ravikant Tupkar : पोलिसांच्या वेशात आलेल्या रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
आत्मदहनाचा इशारा देऊन भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज अचानक सर्वांसमोर आले.
Buldhana News : गेल्या काही दिवसांपासून आत्मदहनाचा इशारा देऊन भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज अचानक सर्वांसमोर आले. पोलिसांच्या वेशात रविकांत तुपकर यांनी बुलढाणा (Buldhana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुपकर त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या वेशात आल्याने रविकांत तुपकर यांना कोणीही ओळखू शकले नाही. मात्र यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले होते. कापस, सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नांवरुन रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला होता. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून तुपकर हे भूमिगत झाले होते. पोलिसांकडून तूपकर यांचा शोध घेतला जात होता.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात तुपकर यांनी सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम देत शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे म्हटले होते. तुपकर अचानक भूमिकत झाल्याने चिंता वाढली होती. मात्र शनिवारी तुपकर हे पोलिसाच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले आणि त्यांनी पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उर्फीच्या कपड्यांची जास्त काळजी
पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. प्रीमियम भरूनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांची सरकारला काळजी आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला सरकारकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावून मुंबई येथील पीक विमा कंपनीचे कार्यालय उद्ध्वस्त करू असा इशारा तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम येथे दिला होता.