2 More Bullet Trains For Maharashtra Starting From Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक म्हणजे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं काम युद्धस्तरावर सुरु असतानाच पंतप्रधान मोदींनी नुकतीच बुलेट ट्रेनच्या 3 नवीन मार्गांची घोषणा केली आहे. यापैकी एक मार्ग उत्तर, एक दक्षिण आणि तिसरा पूर्व भारतात असेल. मात्र भविष्यात भारतामध्ये तब्बल 10 मार्गांवर बुलेट ट्रेन धावणार आहे. भारतीय जनता पार्टीने जारी केलेल्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नव्या 3 मार्गांवरील बुलेट ट्रेनसंदर्भातील उल्लेख आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावेल अशा भारतीय रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र त्यापूर्वीच बुलेट ट्रेनसंदर्भातील इतर सहा मार्गांच्या चाचपणीचं काम सुरु झालं आहे. म्हणजेच सध्या काम सुरु असलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गाचा समावेश करुन एकूण 10 मार्गांवर बुलेट ट्रेन्स धावतील. विशेष म्हणजे यापैकी एक मार्ग हा मुंबई-नागपूरचा असून तो नाशिक मार्गे जाणार असल्यासंदर्भातील चाचपणी सुरु करण्यात आली आहे.


निवडणुकीनंतर लगेच सुरु होणार काम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या काम सुरु असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं बांधकाम नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्परेशनच्या माध्यमातून केलं जात आहे. नवी दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादबरोबरच देशातील इतर सहा मार्गांवरही बुलेट ट्रेन सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. या सहा मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु केल्यास त्याचा व्यवहारिक ताळमेळ कसा बसू शकतो यासंदर्भातील अहवाल तयार करण्यात आले आहेत. सहा मार्गांपैकी 2 मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचं म्हणजेच डीपीआरचं काम निवडणुकीनंतर सुरु होणार आहे. 


महाराष्ट्रात 2 प्रस्तावित मार्ग


ज्या मार्गांवरील बुलेट ट्रेनसंदर्भातील चाचपणी सुरु आहे त्यात मुंबईतून जाणारे एकूण 2 मार्ग आहेत. या मार्गांच्या बांधणीसंदर्भातील अहवालही तयार करण्यात आला आहे. ज्या मार्गांवर बुलेट ट्रेन सुरु करण्याचा विचार असून अहवाल तयार करण्यात आलेत त्यात दिल्ली-अमृतसर, हावरा-वाराणसी-पाटणा, दिल्ली-आग्रा-लखनऊ-वाराणीस, दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, मुंबई-नाशिक-नागपूर, मुंबई-हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे. 


मुंबई-अहमदाबादनंतर या 2 मार्गांवर होणार काम


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर हावरा-वाराणसी आणि दिल्ली-अमृतसर मार्गावरील बुलेट ट्रेनसंदर्भातील काम सुरु होईल. लोकसभा निवडणुकीनंतर डीपीआर अहवाल तयार करण्यास सुरुवात केली जाणार आहे. डीपीआरचं काम सहा ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण केलं जाईल.


पहिला मार्ग 508 किलोमीटरचा


भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग हा 508 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गामध्ये पहिल्यांदाच समुद्राखालील बोगद्यांमधून बुलेट ट्रेन कॉरिडोअर तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचं वेगाने काम सुरु आहे. सुरत आणि बालिमोरादरम्यान या मार्गावरील चाचण्या 2026 मध्ये सुरु होतील. महाराष्ट्र, दादरा-नगर-हवेली आणि गुजरातमधील भूसंपादनाची कामं पूर्ण झाली असून आता बांधकाम वेगाने सुरु आहे.