गणेशोत्सवासाठी निघालेल्या बसला आग; प्रवासी थो़डक्यात बचावले
प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसला
प्रफुल्ल पवार, रायगड, मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड लगबग सध्या पाहायला मिळत आहे. याच वातावरणात एका दुर्घटनेची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसला आग लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. या आगीत बस जळून भस्मसात झाली असली, तरीही सुदैवाने सर्वच्या सर्व ६० साठ प्रवासी बचावले आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने चाकरमानी गावाकडे निघालेले असतानाच ही घटना घडली. ज्यामध्ये आगीमुळे महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडीही पाहायला मिळाली. रायगड – मुंबई गोवा महामार्गावर लोणेरेपासून जवळच टेमपाले येथे धावत्या एस. टी. बसला आगू लागून बस जळून भस्मसात झाली.
अतिशय भीषण स्वरुपात लागलेल्या या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मुंबईतील परेल येथून ही बस चिपळूणच्या सावर्डेजवळील दहीवली खुर्दच्या दिशेने निघाली होती. वडपाले गावाजवळ आली असता बोनेटमधून धूर येऊन बसने अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर आगीचा भडका उडाला आणि बस जळून खाक झाली.
केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी बचावले. मात्र, बससह प्रवाशांचे बसमधील सर्व साहित्यही जळून गेले. महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेनंतर मुंबई गोवा महामार्गावरील कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे . पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.