आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल
खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली .
कोल्हापूर: 'पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर', असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) नावाच्या व्यापाऱ्याने राहत्या घराच्या टेरेसवर गळफास लाऊन आत्महत्या केली.
व्यवसायासाठी कर्ज
प्राप्त माहितीनुसार, उमेश बजाज व त्यांचे बंधू टाकाळा येथे राहतात. दोघांनी मिळून सांगलीतील माधवनगर परिसरात खाद्यतेलाचा उद्योग सुरू केला. त्यासाठी त्यांनी खासगी सावकाराचे कर्ज काढले. या दोघा भावांचे सांगलीतील माधवनगर रोड बुधगाव आणि मार्केट यार्डात दुकान आहे. दोन्ही दुकानांचा आर्थिक व्यवहार उमेश बजाज (मृत) हेच पाहात असत. दरम्यान, सांगली येथील भाऊसाहेब माळी यांच्याकडून जानेवारी ते मार्च २०१७ या काळात प्रतिमहिना ५ टक्के आणि ५ टक्के व्याजदराने तसेच, महेश शिंदे याचेकडून ९ लाख रूपये घेतले होते. रकमेच्या व्याजाचा परतावा म्हणून माळी याला २९ लाख ७५ हजार रूपये तर, शिंदे याला ७ लाख ६५ हजार रूपये वेळोवेळी दिले होते.
धंद्यात मंदी
दरम्यान, उमेश बजाज यांनी सांगलीती खासगी सावकराकडून व्यवसायासाठी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, दिवसेंदिवस धंद्यात मंदी आल्याने कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. त्यातच सावकारांनी मूळ मुद्दल व व्याजाची रक्कम परत द्या यासाठी बजाज बंधूंकडे तगादा लावला होता. यावर सध्या आमच्याकडे पैसेच नाहीत. त्यामुळे ते जमले की तुमचे पैसे परत करू असे बजाज बंधूंनी सावकारांना सांगितले होते.
राजारामपुरी पोलीसांत गुन्हा दाखल
आर्थिक अडचणींमुळे बजाज बंधू नेहमीच चिंतेत असत. त्यात मार्केटमधील त्यांची उसनवारीही वाढली होती. त्यामुळे सततचा तगादा, छळ, टोमणे, आत्महत्या करण्याबाबत दिलेला सल्ला यामुळे उमेश बजाज यांनी टोकाचा निर्णय घेत शुक्रवारी (दि.३ ऑगस्ट) आत्महत्या केली. दिलीप दामोदर बजाज (वय ५८, राज श्रीनिवास बिल्डिंग, तिसरा मजला, माळी कॉलनी टाकाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हा गुन्हा सांगली येथील खासगी सावकार महेश शिंदे, भाऊसाहेब माळी, सचिन ढब्बू, निकिल महाबळ (सर्व रा. सांगली.) यांच्यासह इतर दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.