आमदार अनिल भोसले आणि नगरसेविका रेश्मा भोसलेंविरोधात गुन्हा दाखल
आणखी एका बँकेतील गैरव्यवहार आला समोर
पुणे : विधानपरिषद आमदार अनिल भोसलें आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा भोसले यांच्यासह १६ जणांवर पुण्याच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार अनिल भोसले व्यवस्थापकीय संचालक असताना या बॅंकेतील पैसे त्यांनी संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट नोंदींच्या आधारे स्वत:साठी वापरले आणि त्यामुळे बॅंकेचे ७१ कोटी ७८ लाख रुपयांचे नुकसान झालं अशी तक्रार आहे.
बॅंकेत जमा झालेले ठेवीदारांचे पैसे खोट्या नोंदी करुन परस्पर वापरल्याचं रिझर्व्ह बँकेक्या लेखापरीक्षणात ही समोर आलंय. बँकेचं संचालक मंडळ यापूर्वीच बरखास्त करण्यात आलंय. अनिल भोसले राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेवर निवडून गेले असले तरी तीन वर्षांपासून त्यांनी भाजपशी घरोबा केला आहे.
घोटाळा बाहेर आल्यानंतर खातेदारकांनी बँकेच्या बाहेर गोंधळ घातला होता. बँकेच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर ग्राहकांनी यावर संताप व्यक्त केला होता. खातेदारकांनी आरोपींना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.