जितेंद्र शिंगाडे, प्रतिनिधी, झी मीडिया, नागपूर : गेल्या तीन दिवसात घडलेल्या विविध घटनांमुळं नागपुरात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. रस्त्यावरच्या या मोकाट जनावरांमुळे केवळ सामान्य नागरिकच नाही, तर आता व्हीआयपी देखील हैराण झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित सोमवारी नागपूर दौऱ्यावर आले होते. शहीद गोवारी उड्डाणपुलावरून जाताना त्यांच्या ताफ्यासमोर मोकाट जनावरं आली. तेव्हा सुरक्षारक्षकांना ताफा थांबवून रस्ता मोकळा करावा लागला.


उड्डाणपुलावर मोकाट जनावरं आली कशी, असा प्रश्न यामुळं उपस्थित होतोय. दुसरी घटना भरत नगर भागातली. रक्षाबंधनासाठी आलेली देवश्री कोटांगले ही तरुणी भावासोबत दुचाकीवरून चालली होती. अचानक समोर गाय आल्यानं अपघात झाला. त्यात दोन्ही बहिण भाऊ गंभीर जखमी झाले.


तिसरी घटना घडली ती मुख्यमंत्र्यांच्या सरकारी रामगिरी बंगल्यासमोर रस्त्यावर एक म्हैस अचानक आडवी आल्यानं अपघात होऊन कारचालक जखमी झाला. या अपघातात म्हशीचा मृत्यू झाला.


मोकाट जनावरांमुळं वाढत्या अपघातांचं प्रमाण पाहता वाहतूक पोलिसांनी आता मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुरवात केली आहे. नागपुरात आधीच सर्वत्र सिमेंट रस्त्यांची कामं सुरु आहेत. अनेक रस्ते खोदलेले आहेत. त्यात मोकाट जनावरांच्या समस्येची भर पडलीय.


या मोकाट जनावरांना पकडून ठेवण्यासाठी नागपुरात महापालिकेचे ४ कोंडवाडे आहेत पण मालक त्यांना दंड भरून सोडवून आणतात आणि पुन्हा मोकाट सोडतात. याबाबत कायमचा तोडगा काढण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती समितीनं नागपूरच्या वाठोडा येथे ४५ एकर जागेवर मोकाट जनावरांसाठी शेड बांधण्याची सूचना केली. मात्र आरक्षित जागेची निवड केल्यानं हा अहवाल धूळ खात पडलाय. मोकाट जनावरांच्या समस्येवर प्रशासन आता काय तोडगा काढणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.