Worli Hit And Run: वरळीमधील (Worli) हिट अँड रनच्या (Hit And Run Case) घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेने आपला जीव गमावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे (Shiv Sena) शिंदे गटातील (Shinde Group) उपनेते राजेश शाह (Rajesh Shah) यांना ताब्यात घेतलं आहे. अपघातावेळी राजेश शाह गाडीत नव्हते त्यांचा मुलगा मिहिर शाह (Mihir Shah) आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार असून पोलीस त्याचा आणि चालकाचा शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेपूर्वी मिहीर दारू प्यायल्याचं समोर आलं असून, पहिलं CCTV हाती आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी मिहिर शाह बारमधून बाहेर पडतानाचं CCTV फुटेज 'झी 24 तास'च्या हाती आलं आहे. दुर्घटनेपूर्वी मिहिर शाह दारू प्यायल्याचं समोर आलं आहे. रात्री जुहूमधील ग्लोबल तपास बारमध्ये आरोपी मिहिर शाह याने आपल्या इतर मित्रांसोबत दारू पार्टी केली होती. त्याचं तब्बल 18 हजार 730 रुपयांचं बिल झालं होतं. त्या बिलाचे पैसे त्यानं व्हिसा कार्ड वापरुन ऑनलाइन भरलं होते. बिल भरल्यानंतर मिहिर शाह मित्रांसह बाहेर पडून गाडीत बसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. 



नेमकं काय घडलं?


पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वरळीतील एनी बेझंट मार्गावर अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. दाम्पत्य मच्छी घेऊन परत येत असताना बीएमडब्ल्यूने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवर मच्छी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही चारचाकी गाडीच्या बोनटवर पडले. नवऱ्यानं प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही. अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकानं गाडी पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या महिलेला फरफटत नेलं. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. 


राजकीय प्रतिक्रिया 


वरळी अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. कायद्यासमोर सर्व सारखेच, कोणत्याही पक्षाचा असो. दोषींना शिक्षा होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. 


दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आदित्य ठाकरे पोलीस ठाण्यात पोहोचले होते. याप्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसंच सध्या गाडी चालवण्याची पद्धत बिघडत चाललीय. कायद्याचा दबाव असेल तरच हे प्रकरणं आटोक्यात येईल. असं त्यांनी म्हटलंय.


दुसरीकडे वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे. चालकानं पळून जाण्याच्या नादात महिलेला फरफटत नेलं. त्याच्यावर 302 कलमानुसार म्हणजेच जाणूनबुजून केलेल्या हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.