अमित भिडे, झी मीडिया, मुंबई : कोपर स्टेशनवर उभ्या असलेल्या ठाणे कर्जत गाडीच्या पेंटोग्राफवर पावसामुळे तीन छोटे स्फोट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेनंतर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. संध्याकाळी कामावरून घरी निघालेल्या प्रवाशांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात कोणतीही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवली जात नाही. पहिल्याच पावसामुळे अशी समस्या उद्भवल्याने आता येणाऱ्या पावसात कोणत्या समस्या वाढून ठेवल्यात याची भीती प्रवाशांना त्रस्त करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पहिल्याच पावसात मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर गाड्या खोळंबल्या आहेत. कोपर स्थानकात गाडी पोहोचल्यावर हलके तीन स्फोट झाले. त्यानंतर रेल्वे खोळंबल्याने हजारो प्रवासी कोपर स्टेशनवर अडकून आहेत. पण रेल्वेतर्फे यासंदर्भात कोणतीही उद्घोषणा होत नाही. तांत्रिक अडचणी असतील तर प्रवासी समजून घेऊ शकतात पण रेल्वे कोणत्याही प्रकारची माहीती देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत याचाच राग प्रवाशांच्या मनात आहे.