मुंबई : चित्रपटांमध्ये अनेकदा रेल्वे स्थानक दाखवलं जातं. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला सिनेमाच्या शुटिंगसाठी पसंती दिली जात होती. पण त्यानंतर आता मध्य रेल्वेवरील आपटा रेल्वे स्थानक हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वात लोकप्रिय स्थानक ठरत आहे. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात आपटा रेल्वे स्थानकावर रात अकेली है, मुंबई सागा आणि शुभ मंगल झायदा सावधान यासह चार चित्रपटांचं शुटिंग झालं. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ८ चित्रपटांचे शुटींग झाले होते. त्यामध्ये लोकप्रिय चित्रपट पंगा, चोक्ड आणि सूरज से मंगल भारी या चित्रपटांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, रंग दे बसंती, बागी, खाकी, शादी नंबर १, चाइनाटाऊनसह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपटा स्टेशन कॅमेर्‍याबद्ध झालं आहे. 


मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी सुतार म्हणाले की,'आपटा निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो, ज्याच्या एका बाजूला टेकडी आहे, दुस-या बाजूला नदीजवळील रस्ता आणि पोहोचण्यास  सुलभ रस्ता आहे, वळणदार ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मसह पनवेल-रोहा मार्गावर हे स्थानक आहे. कलाकारांची व्हॅनिटी व्हॅन्स पार्क करुन ठेवण्यासाठी पुरेशी जागा येथे आहे. कमी गर्दी असलेले असे स्थानक चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी योग्य स्थानक आहे.' 


आपटा रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे आणि ते क्रॉसिंग स्टेशन असल्याकारणाने आणखी एक ज्यादा ट्रॅक असून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुक केलेल्या विशेष गाड्यांच्या हालचालींसाठी जास्त सोयीची आहे. आपटा हे स्थानक फिल्म सिटी, मुंबईपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असून प्रवास फक्त २ तासांचा आहे. त्यामुळे वेब मालिका, माहितीपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी आपटा रेल्वे स्थानक सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे.
 
मध्य रेल्वेला २०१९-२० मध्ये २१ चित्रपटाच्या चित्रीकरणातून १.३३ कोटीचं उत्पन्न मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक येथे ८ चित्रपटांचं शूटींग झालं. ज्यातून ४४.५२ लाखांचं उत्पन्न तर आपटा स्थानकात ४ चित्रपटांचं शूटिंग झालं त्यातून २२.६१ लाखांचं उत्पन्न मध्य रेल्वेला मिळालं आहे. रजनीकांत यांच्या दरबार सिनेमातून सर्वाधिक २२.१० लाखांचं उत्पन्न रेल्वेला मिळालं आहे. पुणे विभागातील निसर्गरम्य वाठार स्थानकात सलमानच्या दबंग 3 सिनेमाचं शूटींग झालं. ज्यातून १५.६२ लाखांचं उत्पन्न मिळालं.