दिवाळीत गावी जायचंय, पण तिकिट मिळेना; मध्य रेल्वेची मोठी घोषणा, मुंबई-पुण्यातून...
Cenral Railway Special Train For Diwali: दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा, स्पेशल ट्रेन चालवणार
Cenral Railway Special Train For Diwali: दिवाळीत अनेकांना गावी जाण्याचे वेध लागतात. सण आपल्या माणसांसोबत साजरा करण्याची मज्जा वेगळीच असते. त्यामुळं दिवाळीच्या आधीच आपसूकच चाकरमान्यांचे पाय गावाकडे वळू लागतात. मात्र, अनेकदा गावी जाण्यासाठी ट्रेनचे तिकिट कॅन्सल होते किंवा आयत्यावेळी तिकिट मिळत नाही आणि सगळा हिरमोड होऊन जातो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची गर्दी कमी व्हावी यासाठी दिवाळी आणि छट सणासाठी स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहे.
मुंबई आणि पुण्यातून राज्यातील विविध भागात आणि राज्याबाहेरही अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. नागपूर, कोल्हापूरसाठी मुंबई पुण्यातून स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहे. 14 ऑक्टोबर 2023पासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन बुकिंग सुरू झाले आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने आत्ताच तिकिट बुकिंग करु शकता.
सीएमएमटी-नागपूर पाक्षिक सुपरफास्ट स्पेशल
०२१३९ मुंबई (सीएसएमटी)- नागपूर ही सुपरफास्ट द्वि साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या काळात धावेल. दर सोमवार आणि गुरुवारी मुंबईवरून ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहचेल.
०२१४० नागपूर- मुंबई ही गाडी २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या काळात दर मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नगपूरवरून निघेल व दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता मुंबई येथे पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एसी थ्रीचे १६ कोच राहतील
नागपूर-पुणे साप्ताहिक स्पेशल सुपरफास्ट स्पेशल
- ०२१४४ नागपूर- पुणे सुपरफास्ट ही गाडी १९ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या काळात दर गुरुवारी नागपूरवरून निघेल व दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुण्याला पोहचेल.
- ०२१४३ पुणे- नागपूर- ही गाडी २० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी पुण्यावरून १६.१० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता नागपूरला पोहचेल. या गाडीला वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि उरळी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एसी थ्रीचे १६ कोच राहतील.
कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेस
कोल्हापूर -पुणे दरम्यान सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यात येत आहे. दिवाळीच्या काळात पुणे-कोल्हापूर-पुणे अशी विशेष रेल्वे असून ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान या गाडीच्या ११४ फेऱ्या होणार आहेत. पुणे- कोल्हापूर ही गाडी पुण्यातून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. कोल्हापूरला सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापूरहून ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ती गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात येईल.