नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे शहर आणि परिसरात चेन स्नॅचिंग, घरफोड्या, वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतल्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यात दोन किलो सोनं आणि ६६ लाख रूपये रोख रक्कम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहरात चेन स्नॅचिंगच्या, वाहन चोरीच्या वाढत्या घटना घडत असल्याने पोलीस गस्त घालत असताना दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची नावे जफर इराणी व अमजद पठाण आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता पोलिसांना मोठी माहिती मिळाली... हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. पुणे शहरात चेन चोरीचे १८, फसवणुकीचे १८, घरफोडीचे ५, वाहन चोरी १, इतर ९ असे एकूण ५१ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आलंय. जप्त केलेल्या वस्तूमध्ये मौल्यवान वस्तू आणि परकीय चलन आहे. यामध्ये सोन्याचे दागिने ५९ लाख ७६ हजाराचे, चांदीचे दागिने ४ हजार १९० रुपयाची, रोख रक्कम ६६ लाख ४ हजाराचे, परकीय चलन (पौंड, डॉलर) ३ लाख ८ हजार ४१२ रुपयाचे तसेच आरोपिकडून तीन दुचाकी व चार वाहने जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती डीसीपी पंकज डहाने यांनी दिलीय. 


या आरोपिकडून काही हत्यारे, इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत केल्या आहेत. यात बायनाक्युलर लावलेली छऱ्याची बंदूक, स्किल कंपनीचे १८०० व्याटचे कटर मशीन, एकूण विविध कंपनीचे ८ मोबाईल, विविध सिमकार्ड, एकूण चार हेल्मेट, जर्किन, एक मल्टी युज हॅन्डकटर अशा वस्तू हस्तगत केल्या आहेत. हे दोन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या दोघांवरही अनुक्रमे १२ गुन्हे व ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडे एकूण १ कोटी ४० लाख ६९ हजार ४६४ एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींनी दौंडजवळ चोरीच्या पैशातून एक फार्म हाऊस घेतल्याचंही पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याचीही कींमत दीड कोटींच्या घरात आहे. 


हे आरोपी प्रत्येक वेळी साथीदार बदलून गुन्हा करत होते. पोलिसांना अजून यांच्या साथीदाराचा तपास सुरु आहे. त्यामुळे त्यांच्याकडून २५ - ३० गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढा माल त्यांनी कसा आणला? यांचे साथीदार कोण आहेत? याचा तपास करण्याचे काम आता पोलीस करत आहेत.