नाशिक : नाशिक शहरातील गेल्या काही दिवसांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सणासुदीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस यंत्रणेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पोलिसांच्या कामगिरीवर नाशिककर नाराज आहेत. त्य़ातच आता नवरात्रीमध्ये चोरट्यांचं अधिकच फावणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २७ दिवसामध्ये नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या तब्बल ७ घटना घडल्या आहे. मुंबई नाका परिसरात चार दिवसांपूर्वी महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबडल्याची घटना ताजी असतांना त्याच ठिकाणी पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चालत्या वाहनावरून खेचून नेलंय. यामुळे पोलिस करतायत काय, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. 


वाहनांच्या डिकीतूनही पैसे आणि साहित्य लंपास होत असल्याच्या तक्रारीही वारंवार येतायत. गेल्या महिन्याभरात ७ लाख ७ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. ऐन सणासुदीला या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढवलीये. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली, क्यूऑक्स मशीन यंत्रणा, निर्भया पथक, मोबाईल व्हॅन, बिट मार्शल अशी यंत्रणा उभी केली आहे.


दुसरीकडे आता स्मार्ट सिटी योजनेतून शहरात आठशे कॅमेरे तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्ष तयार झाला आहे. मात्र महिला सुरक्षित आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी केलेले अनेक प्रयोग अनेकदा यशस्वी ठरत असल्याचं दिसतं आहे. आता नवरात्रीच्या काळात गुन्हेगारीमध्ये वाढ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.