संजय राठोड यांना मोठा झटका लागण्याची शक्यता, मंत्रीपद धोक्यात
संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे.
दीपक भातुसे, मुंबई : संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे. वनमंत्री संजय राठोड यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्ती प्रदर्शनाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्यांचं पद धोक्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी याप्रकरणी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचं चित्र तयार झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोहरादेवी इथल्या गर्दीप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याने राठोड यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे.
पोहरादेवीमध्ये झालेल्या गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच असं मुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. कोरोना काळात वनमंत्री संजय राठोड यांनी जमवलेल्या गर्दीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या गर्दीप्रकरणी वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाईचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोहरादेवीमध्ये येथे झालेल्या गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.