...म्हणून कोल्हापूर सोडून पुण्यात आलो, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं पुण्यात येण्यामागचं कारण
पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांना कोल्हापूरमधून पुण्यात शिफ्ट होण्यामागचं कारण स्वतःच सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील हे सध्या पुण्यातील (Pune) कोथरूडचे आमदार आहेत. याआधी ते कोल्हापूरमध्ये पक्षासाठी काम करत होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील विधानपरिषदेचे सदस्यत्व होते.
मात्र 2019 साली चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून संधी देण्यात आली होती. तेव्हा मेधा कुलकर्णी यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र आता त्यांनी कोल्हापूरातून पुण्यात येणाच्या कारण स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण
पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी आपल्याला पुण्यात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यातील हांडेवाडी मध्ये भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील सर्व सत्ता स्थानक भाजपच्या ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली तसेच सोलापूर मधील काँग्रेस राष्ट्रवादीच सत्ताकारण संपुष्टात आणलं त्याचप्रमाणे पुण्यात आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळवून देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
"विधानसभेच्या निकालानंतर विश्वासघाताने सरकार गेलं आणि आपल्याला त्रास देणारं सरकार या महाराष्ट्रात आलं. पण २०१९च्या निवडणुकीवेळी अनेक कार्यकर्त्यांना वाटलं की, कोल्हापूरमध्ये काम करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना अचानक पुण्यामध्ये का आणलं. अनेकांनी तर्कवितर्क लावले. कोल्हापूर,सांगली, सातारा, पुणे येथेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. ही मक्तेदारी आपण गेल्या काही वर्षांमध्ये संपवून टाकली आहे. याचा अनुभव असणारा आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थानाला सुरुंग लावण्यासाठी कार्यकर्ता पुण्याला शिफ्ट करण्याचा पक्षाने निर्णय घेतला," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.