चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली अन् शहराबाहेर झाला मृत्यू; रात्रभर आईला कवटाळून रडत होता मुलगा
Chandrapur Accident : चंद्रपुरातून अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आईसोबत गेलेला मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur Accident) एका दुर्दैवी घटनेत महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे. चार वर्षीय मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी स्कुटीने निघालेल्या आईचा वर्धा नदी पुलाच्या खाली मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. महिलेसोबत तिचा चार वर्षीय मुलगा देखील जखमी अवस्थेत आढळला आहे. चार वर्षाचा मुलगा रात्रभर आईला धरून रडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातात मृत पावलेली महिला ही तीन महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी (Chandrapur Police) याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एक दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी निघालेली एक गर्भवती महिला तिच्या स्कुटीसह बल्लारपूर शहरालगतच्या वर्धा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या घटनेत तिचा मृत्यू झाला तर सोबत असलेला चार वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलगा रात्रभर आईला कवटाळून रडत होता असे महिलेचा शोध घेणाऱ्यांनी पाहिलं.
बल्लारपूर शहरातील बामनी येथे वास्तव्यास असलेले पवन काकडे घरी आल्यानंतर त्यांच्या चार वर्षीय मुलाने चॉकलेटचा हट्ट धरला होता. पवन काकडे यांनी आईसोबत जा, असे सांगितल्यावर पुष्पा पवन काकडे चार वर्षीय मुलाला घेऊन स्कुटीने घराबाहेर पडल्या. मात्र तासभर त्या परतल्याच नाही. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. रात्री एक वाजताच्या सुमारास बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यावर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. रात्री उशिरा त्यांचे पती पवन काकडे यांनी ईमेल लोकेशनद्वारे पुष्पा यांचा पत्ता शोधून काढला. त्या नदीच्या परिसरात मोबाईल असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर सर्वच शोध पथकांनी परिसर पिंजून काढल्यानंतर पुलाच्या खाली मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतल्यावर मृतावस्थेत असलेल्या गर्भवती पुष्पा व त्यांना कवटाळून रडत असलेला चार वर्षीय मुलगा आढळून आला. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुष्पा काकडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. मात्र आता चॉकलेट आणण्यासाठी गेलेली ही महिला शहराच्या बाहेरील भागात कशी गेली यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी काय सांगितले?
"पंजाब नॅशनल बॅंकेत नोकरी करणाऱ्या पुष्पा काकडे या घरी आल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना मला चॉकलेट हवं आहे असू म्हणू लागला. त्यानंतर पुष्पा काकडे या मुलाला घेऊन चॉकलेट घेण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. एक दीड तास पुष्पा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. रात्रभर शोध घेतल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पुष्पा यांचे लोकेशन तपासले असता राजुरी येथील पुलाजवळ आढळून आले. तिथे जाऊन पाहिलं असतं मुलगा जखमी अवस्थेत आढळला तर पुष्पा यांचा मृतदेह सापडला आहे," अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.