Balu Dhanorkar Passed Away:  राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर (47) यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा पासून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. बाळू धानोरकर यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे. धानोरकर यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवार 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दिल्लीतील मेदांता रुग्णालयात पहाटे 3 वाजून 30 मिनिटानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म 4 जून 1975 ला यवतमाळ जिल्ह्यात झाला होता. 


आठ वर्षांपूर्वी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया


धानोरकरांवर आठ वर्षांपूर्वी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना 26 मे 2023 रोजी किडनी स्टोनचा त्रास जाणवू लागला होता. नागपुरात अरिहंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, अधिक त्रास जाणवू लागल्याने एअर अँम्बुलन्सने दिल्लीला नेण्यात आले. मेदांतामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवून डायलिसिस करण्यात आले. लाईफ सपोर्ट सिस्टीमवर असतानाच पहाटे 3 वाजता निधन झाले. आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.



 शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसकडून खासदारकी


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती गावचे रहिवासी बाळू धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. स्थानिक पातळीवर जम बसवल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडूनच आमदारकी मिळवली. संघटना मजबूत करत चंद्रपूरमध्ये धानोरकरांनी शिवसेना बळकट केली. 2014 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून भद्रावती वरोरा विधानसभेतून निवडून आले होते. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसकडून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून आले. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. भाजपाच्या बालेकिल्ल्यात त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. एवढंच नव्हे तर, पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाही विधानसभेत निवडून आणले.