आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : परिसरात सतत दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाची त्याच परिसरातील 4 जणांनी मिळून हत्या केल्याची घटना चंद्रपुरच्या (Chandrapur Crime) बल्लारपूर शहरात घडली आहे. भांडणे, शिवीगाळ करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला चौघांनी कायमचं शांत केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर चारही आरोपींना पोलीस ठाण्यात (Chandrapur Police) जात आत्मसमर्पण केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही थरारक घटना बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्डात घडली आहे. दीपक रामआसरे कैथवास (28) असे मृतकाचे नाव आहे. बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रवींद्र वार्ड, कारवा रोड येथे राहणारा 28 वर्षीय दीपक कैथवास या युवकाची चार जणांनी मिळून हत्या केली. त्यानंतर चारही आरोपींनी पोलीस ठाण्यामध्ये जात आत्मसमर्पण केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.


मृतक दीपक कैथवास हा गुंड प्रवृत्तीचा युवक होता. दीपक हा परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करत राहायचं. यादरम्यान दीपकने एका युवकाला बेदम मारहाण केली होती. त्याचा काटा काढण्यासाठी चार आरोपींनी मिळून दगडाने ठेचून दीपकची निर्घृण हत्या केली. आरोपी अर्जुन राजू कैथवास (28), प्रथम शंकर पाटील (25), गौरव राजू लिडबे (22) तिघेही मौलाना आझाद वार्डमध्ये राहत होते. तर चौथा आरोपी अमन दुखशौर कैथवास (20) , बुद्धनगर वार्डमध्ये राहत होता. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.


मृत दीपक हा परिसरातील नागरिकांना मारहाण करायचा, त्यांना नाहक त्रास द्यायचा. दीपकने आरोपी युवकांना देखील  अनेकदा मारहाण केली होती. त्याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी आणि दीपकची दहशत संपविण्यासाठी बुधवारी रात्रीच्या सुमारास आरोपींनी त्याला गाठले. आरोपींनी दीपकवर लोखंडी रॉड, लाठी काठीने जोरदार वार केले आहे. याच हल्ल्यात दीपकचा मृत्यू झाला.


चंद्रपूरमध्ये वृद्ध शेतकऱ्याची हत्या


शेतीच्या वादातून चंद्रपूरच्या वडगावमध्ये 60 वर्षीय वृद्धाची कुऱ्हाडीने वार करुन खून केला आहे. पांडुरंग रामजी चव्हाण  असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पांडुरंग व आरोपींमध्ये शेतातील रस्त्यावरुन वाद सुरू होता. तहसीलदारांच्या मध्यस्थीने पांडुरंग यांना शेतात जाण्याकरता रस्ता मिळाला होता. पांडुरंग चव्हाण या रस्त्याने जात असताना आरोपी विशाल विठ्ठल राठोड, सोनू डोमा राठोड, इंदल उत्तम राठोड, राहुल संतोष जाधव, प्रकाश नरसिंग राठोड, खुशाल भीमराव राठोड, कैलास नरसिंग राठोड या सात जणांनी त्यांना जबर मारहाण केली आणि कुऱ्हाडीने वार करुन खून केला.