चंद्रपूर : जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी आता काही प्रमाणात ओसरायला सुरुवात झाली आहे. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने पूरग्रस्त गावातील पाणी पातळी दोन ते तीन फूटपर्यंत कमी झाली आहे. मात्र पुरात अडकलेल्या १४०० लोकांना गावाबाहेर काढण्याची महत्वाची कामगिरी प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. गोसेखुर्द धरणाचा विसर्ग ३१ हजार क्युमेंक्स वरून १५६१० क्युमेंक्सपर्यंत घटविण्यात आला आहे.


 हेलिकॉप्टरद्वारे खाद्य पाकिटे, पाणीपुरवठा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात वैनगंगा नदीकाठच्या शेकडो गावांना पुराने वेढले आहे. यातील पंधरा गावे अतिबाधित आहेत. या सर्व गावांमध्ये वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे खाद्य पाकिटे व पाणी पोहोचविले गेले. गेले तीन दिवस हा भाग पूरग्रस्त आहे .राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागाची हवाई पाहणी केली तेव्हा परिस्थिती अपेक्षेपेक्षाही बिकट असल्याचे पुढे आले आहे.


गडचिरोलीत पूर


गडचिरोली जिल्ह्यातील महापूराची तीव्रता जास्त दिसून येत आहे. वडसा येथील रेल्वे पुलावरून पुराची परिस्थिती किती अधिक आहे ते दिसत आहे. गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्यानंतर वैनामाय कोपल्याचे हे दृश्य थरकाप उडविणारे आहे. या भागातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेल्वे पुलाला  पाणी स्पर्श करत आहे. उंचावर बांधले जाणारे रेल्वे पूल देखील या महापुराचे साक्षी ठरले आहेत. वैनगंगा नदीचे रौद्ररूप या महापुराचे कारण ठरले आहे. 


भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती 


भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, मध्यप्रदेश येथील संजय सरोवर व बावनथडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे भंडारा जिल्ह्यात बावनथडी, वैनगंगा नदीला पूर आला होता,  संजय सरोवर व बावनथडी धरणातुन पाण्याचा विसर्ग कमी केल्याने भंडारा जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांनी सुटकेचा निस्वास घेतला आहे.