मुंबई : चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्राच्या चिमणीवर चढलेले सात प्रकल्पग्रस्त १० दिवसांच्या आंदोलनानंतर काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खाली उतरले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. प्रकल्पग्रस्तांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत होते. तसेच निवदने देऊनही याची साधी दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अधिक आक्रमक झाले. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांनी 'शोले' स्टाईलने आंदोलन करण्याचा निर्धार केला. तब्बल दहा दिवस त्यांनी  औष्णिक वीज केंद्राच्या चिमणीवरच ठिय्या मांडला. जिल्हा प्रशासनाकडूनही त्यांना विनंती करण्यात आली. मात्र, आमची दखल कोणीच घेत नाही, जोपर्यंत ठोस काही होत नाही, तोपर्यंत येथे राहण्याचा निर्धार केला. दरम्यान, पालकमंत्र्यांनी आश्वासन देत चर्चा घडून आणली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता राजेश कुमार ओस्वाल, राजेश राजगडकर, ठाणेदार दिपक खोब्रागडे तसेच शिलवंत नांदेकर, प्रकाश देवतळे उपस्थित होते.


सिटीपीएस विश्रामगृहावर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांची लवकरच ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे.  त्यामध्ये यासंदर्भात अंतिम तोडगा निघणार आहे.  वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.