Ladka Yojna: मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली आहे. याद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये येणार आहे. राज्यभरातून या योजनेचे स्वागत केले जात आहे. तसेच लाडका भाऊ योजना आणण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. ही मागणी गांभीर्याने घेत लगेच महिन्याभराच्या आत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आता लाडका भाऊ योजना आणण्यात आली. दरम्यान आता तृतीयपंथीयांकडूनदेखील शिंदे सरकारकडे योजनेची मागणी करण्यात आली आहे. आता तृतीयपंथीयांनी देखील सरकारकडे  'लाडका' योजनेची मागणी केली आहे. चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिले. तृतीयपंथीय समाजातील दुर्लक्षित -वंचित घटक असल्याची आठवण निवेदनातून करून दिली आहे. 


लाडका योजनेची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात बहिणी आणि भावांसाठी सरकारच्या योजना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांनी देखील आवाज उचलला आहे. राज्य सरकारच्या वतीने सध्या जाहीर करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांसाठीच्या योजनांची देखील सुयोग्य अंमलबजावणी होत नसल्याचे मनसेने लक्षात आणून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तृतीयपंथीयांनी लाडका योजना राबवण्यासाठी आग्रह धरलाय.


लाडकी बहिण योजना


महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.या योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज भरता येत नाही, त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वॉर्ड/सेतू सुविधा केंद्र उपलब्ध असतील. प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी योग्य पोच पावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. महत्त्वाचे म्हणजे अर्ज भरताना ती महिला त्याठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.


लाडका भाऊ योजनेविषयी



लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाडका भाऊ योजनेअंतर्गत, आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे राज्य सरकार पैसे भरेल अशी माहितीही देण्यात आली आहे.