धक्कादायक ! चंद्रपुरात रुग्णवाहिकेतून दारुची तस्करी
दारुबंदी असलेल्या चंद्रपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : दारुबंदी असलेल्या चंद्रपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अवैध वाहतूकीसाठी अनेक क्लुप्त्या काढल्या जात आहेत. १०८ या रुग्णवाहिकेतून दारुची तस्करी होत असल्याचं उघड झालं आहे. शहरातील बाबूपेठ भागात रामनगर पोलिसांनी कारवाई करून अवैध दारु जप्त केली. यवतमाळहुन चंद्रपुरात ही दारु आणली जात होती. जवळपास ६ लाखाच्या दारुसह १६ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चालक राहुल वानखेडे याला अटक करण्यात आली आहे.
चंद्रपुरात गेली ४ वर्षे दारुबंदी करण्यात आली आहे. पण यानंतरही कोट्यवधी रुपयांची दारु अवैधरित्या जिल्ह्यामध्ये पोहोचत आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. पण अवैध दारुची वाहतूक आणि विक्री थांबायचं नाव घेत नाहीये.
रुग्णवाहिकेतून दारुच्या वाहतुकीची ही पहिलीच घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन आरोपी सध्या फरार आहेत. रुग्णवाहिकांचे केंद्रीकृत संचालन होत असते, त्यामुळे रुग्ण वाहनात नसताना ही रुग्णवाहिका चंद्रपुरात कशी पोहोचली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तिन्ही लगतच्या जिल्ह्यात सध्या दारुबंदी आहे. त्यामुळे यवतमाळ आणि नागपूरमधून दारुतस्करीचं प्रमाण हे वाढलं आहे.