चंद्रपुरात भीषण अपघात; बससमोर आल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
Chandrapur Accident : चंद्रपुरात घडलेल्या या अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झालाय. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारच्या पुढच्या भागाचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यात एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरवरून (Nagpur Accident) नागभीडकडे येणाऱ्या अल्टो कारने एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसला समोरून धडक दिल्याने चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात कार मधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तर एक मुलगी व महिला गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला.
नागपूरवरून नागभीडकडे जाणारी मारुती अल्टो कार आणि एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. चौघेही मृत हे नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात एवढा भीषण होता की मृतांना बाहेर काढण्यातही अडचण येत होती. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर मृतांना कार कापून बाहेर काढण्यात आले.
नेमकं काय घडलं?
नागपूर येथील हे कुटुंब एमएच 49 - बीआर 2242 या अल्टो कारने नागपूरकडून नागभीडकडे जात होते. त्याचवेळी एआरबी ट्रॅव्हल्सची एमएच 33 टी 2677 ही बस नागभीडवरून नागपूरला जात होती. त्याचवेळी कानपा गावाजवळ नागभीडकडे जात असलेल्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अल्टोने बसला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा पुढील भाग चेपला गेला आणि चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गॕस कटरने दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
समृद्धी महामार्गावर तिघांचा मृत्यू
लग्नसोहळा आटोपून निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील फर्दापुर जवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत. वाशिममध्ये लग्नसोहळा आटोपून हे कुटुंब मालेगावकडून परत येत होतं.त्यावेळी झालेल्या विचित्र अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. गाडी थांबवून कारमधील तिघेजण लघवी करण्यासाठी खाली उतरले होते. त्याचवेळी त्यांच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सरने त्यांना उडवलं. त्यानंतर हा ट्रक गाडीवर जाऊन आदळला.