आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : 21 व्या शतकात डिजीटल भारताची स्वप्न पाहिली जात आहे. महाराष्ट्रही प्रगतीच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे. पण याच प्रगतशील महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात मात्र आजही 'विकास' शोधावा लागतोय. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागात पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतिक्षाच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक चीड आणणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. पुलाअभावी चक्क पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या करंजी गावात गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीला जोडणाऱ्या पुलाची निर्मिती रखडली आहे. अनेकवेळा विनंती करुनही हा पूल पूर्ण झालेला नाही. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे.


सध्या जिल्ह्यात विविध भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुराचं पाणी गावात शिरलंय. याचाच फटका करंजी गावाला बसलाय. गावात एका व्यक्तीचं निधन झालं. गावापासून स्मशानभूीला जोडणारा पूल नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातूनच अंत्ययात्रा काढावी लागली. 


महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्न पाहणाऱ्या सर्वांसाठीच ही डोळ्यात अंजन घालणारी घटना आहे.