चंद्रपूर : चंद्रपुरातील अल्पवयीन मुलीला हरियाणात विकण्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षानंतर उघडकीस आल्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत चंद्रपुरातील चार महिलांना अटक करण्यात आली आहे. या मानवी तस्करीच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेले चंद्रपूर पोलिसांचे विशेष पथक आज हरिणायाकडे रवाना झाले. याप्रकरणातील सुमारे १५ आरोपी हरिणायातील विविध जिल्ह्यात असल्याची माहिती आहे. ते हाती लागल्यास मानवी तस्करीची साखळीच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


पोलीस कोठडीतील आरोपींनी आतापर्यंत वीसच्या वर मुली लग्नाच्या नावावर विकल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील पीडीतेला पोलिसांनी दोन जानेवारीला चंद्रपुरात आणले. तर इतरही मुलींचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जातो आहे. पण ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.