... म्हणून चंद्रपुरातील `या` गावात कुणीच झोपत नाहीये
पाहा नेमकं झालंय तरी काय?
आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: चंद्रपुरमधल्या गावकऱ्यांची सध्या झोपच उडालीय. गडचिरोली जिल्ह्यातल्या तेलंगणा सीमेपासून ते अगदी नांदेडपर्यंतचे गावकरी रात्रीच्या रात्री जागून काढतायत. नेमकं झालंय तरी काय?, चला पाहूयात...
चंद्रपुरमधल्या गावकऱ्यांचा डोळ्याला डोळा लागत नाहीये. गावातले शेकडो गावकरी रात्रभर डोळ्यात तेल घालून गस्त घालत असतात. कारण या सगळ्यांना सध्या अफवांच्या रोगानं ग्रासलंय. ऐन मध्यरात्री किडनीचोरांची टोळी येते आणि मुलं-माणसांना उचलून पसार होते, अशी अफवा इथं पसरलीय.
कुणाला रात्री जंगलात शेकडो टॉर्च दिसतात... कुणाला १५-१६ लोकांची टोळीही दिसते आणि अचानक बेपत्ता होते. कुणी लहान मुलांना पळवून नेल्याचं सांगतंय, तर कुणी टोळीला जंगलात पळताना पाहिलंय... एक ना धड शेकडो अफवा... त्यामुळंच गावातली लहानथोर पुरूष मंडळी लाठ्या काठ्या घेऊन खडा पहारा देतायत.
अफवांचा या गावकऱ्यांवर एवढा प्रभाव पडलाय की, गावात शिरणाऱ्या अनोळखी माणसाला चक्क आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवावं लागतंय. गावात येणाऱ्या पाहुण्यांना आणि पर्यटकांना याचा फटका बसतोय.
या अफवा नेमक्या कोण पसरवतंय, याचा पोलीस कसून शोध घेतायत. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः गावागावात जाऊन या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करतायत. नागरिकांच्या समाधानासाठी हत्यारबंद पोलिसांची व्हॅनही गस्तीसाठी ठेवण्यात आलीय.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांचे आवडते स्थळ... नेमक्या याच भागात अफवांचा वेग जास्त आहे. या अफवांमुळं एकाला मारहाणीत आपला जीव देखील गमवावा लागला. सोशल मीडियामुळं या अफवा अधिक वेगानं पसरत असल्याचं सांगितलं जातंय. पोलीस आता यावर कसं नियंत्रण ठेवणार, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.