Maharashtra Politics : `पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...`, भाजप नेत्याची घणाघाती टीका
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Maharashtra Politics, Sharad Pawar : देशात मोदींच्या रुपाने नवीन 'पुतीन' तयार होत आहे का ? असा सवाल करत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा निशाण्यावर घेतलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) कुठंही गेले तरी जवाहरलाल नेहरुंवर टीका करतात. पण संसदेत मान खाली घालून बसतात. त्यामुळे एकप्रकारची दहशद निर्माण होते, असंही शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. त्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाची पुतना मावशी असा उल्लेख शरद पवारांचा केला.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
महाराष्ट्राच्या राजकारणातील पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये पुतीन दिसायला लागलेत. शरद पवारांचं विखारी राजकारण जनतेनं अनुभवलं. त्यामुळेच सुज्ञ मतदारांनी त्यांना नाकारलं, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आताही मतदारांचा ‘मोदी की गॅरंटी‘वर विश्वास आहे. त्यामुळेच पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ‘पुतीन-पुतीन‘ करत पवारांनी रडगाणं सुरू केली आहे, अशी टीका देखील बावनकुळे यांनी केलीये.
शरद पवारांनी मोदीजींना कितीही नावं ठेवली तरी पालघर साधू हत्याकांड, गोवारी हत्याकांड, मावळमधील शेतकऱ्यांवर केलेल्या अमानुष गोळीबाराच्या निमित्तानं दिसलेला पवारांचा उग्र चेहरा मतदार कधीच विसरणार नाहीत, असं घणाघात देखील बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून यावर काय प्रत्युत्तर येतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, ज्यांच्या हातात कारभार हातात सोपवला, त्या गृहस्थाने सत्ता हातात आल्याचया नंतर त्यांच्या भूमिकेपेक्षा, त्यांच्या विचारांपेक्षा वेगळी मतांची मांडणी कोणी केली तर त्यांना जेलची हवा दाखवण्याचं काम त्यांनी केलं. एकप्रकारची हुकूमशाही आणण्याची इच्छा त्यांची आहे आणि त्याबाबतीत जाग राहिलो नाही तर तुमचं आमचं जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज दिल्ली देशाची राजधानी आहे. त्या राजधानीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं ते अरविंद केजरीवाल...पंतप्रधान यांच्या विषयी उदगार काढले तर आज त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, अशी टीका देखील शरद पवारांनी केली होती.