पुणे : १ जानेवारीच्या ''शौर्य दिना'ला यावर्षी २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून कोरेगाव भीमा इथून लाखो अनुयायी विजय स्तंभाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी इथल्या तयारीची स्वतः पाहणी केलीय. दरम्यान, कोरेगाव भीमा आणि चैत्यभूमीवर जाणार असल्याचा निर्धार भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी केलाय. चंद्रशेखर आझाद पुण्याला पोहोचल्यावर त्यांनी आपली भूमिका जाहीर केलीय. आपण 'कोरेगाव भीमाला जाणारच... शक्य झाल्यास पुण्यातून पायी कोरेगाव भिमापर्यंत चालत जाणार' असल्याचं आझाद यांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान न्यायालयाने परवानगी दिली तर सभा घेणार. परवानगी दिली नाही तर न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे म्हटलंय. कोरेगाव भिमा मध्ये सभा घेणार नसल्याचे सांगताना आपण सामान्य कार्यकर्ता. आहोत आणि आपण फक्त अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केले.


मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे बाहेर का? असा सवालही उपस्थित करत ही संविधानाची हत्या असल्याचंही आझाद यांनी म्हटलंय. मात्र पुण्याला जाण्याआधी आझाद यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दरम्यान भीम आर्मीला २ तारखेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही सभा घेण्यास बंदी घालण्यात आलीय. ३१ डिसेंबरला चंद्रशेखर आझाद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंबेडकरवादी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. मात्र विद्यापीठाकडून या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे.