अंबरनाथ : आपल्या कलागुणांनी अनेक जण समाजाचं हृदय जिंकत असतात. आपल्याकडे असलेल्या याच कलेचा उपयोग अनेक कलाकार हे वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यासाठी, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांसाठी करत असतात. अशीच एक कलाकार विविध कला-गुणांची आवड असणारी स्वाती ही चित्रकला आणि हस्त कौशल्यामध्ये निपुण आहे. रांगोळी, मेहंदी, चित्रे या सर्व माध्यमांचा वापर समाजातील विविध विषय मांडण्यासाठी ती करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, पाण्याचा उपव्यय टाळा, पर्यावरण संवर्धन अशा अनेक विषयांवर अंबरनाथ येथे राहणारी स्वाती ही आपल्याकडे असलेल्या कलेतून भाष्य़ करत असते. गेल्यावर्षी बनवलेल्या कंदिलाची दखल घेत तिच्या कलेला व्यवसायाचे प्राथमिक स्वरूप येऊन काही रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने "टाटा कॅपिटल" सारख्या संस्थेने तिला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं.


भारताने चांद्रयान मोहिमेसाठी घेतलेली मेहनत आणि त्यासाठी भारताने विकसित केलेले स्वतःचे तंत्रज्ञान याबाबत मुलांमध्ये विशेषतः शालेय मुलांमधे, तरुणांमध्ये जागृती व्हावी म्हणून तिने यावेळी आकाश कंदीलसाठी चांद्रयानमधील लँडरची प्रतिकृती निवडली. हे कंदील बनवताना चांद्रयान बद्दल माहिती सोबतच चंद्र, पृथ्वी, अवकाश आणि खगोलशास्त्र या संबंधीची माहिती तीने मुलांना दिली. मुलांनी एकत्रितपणे कंदील ही बनवले. हे कंदील पाहून परिसरातील लोकांचं कौतुक तर मिळत आहेच, पण लोकांनी आग्रहाने असे कंदील बनवून देखील घेतले.



आकाश कंदीलच्या माध्यमातून देखील समाज प्रबोधनासाठी आणि सामाजिक विषयाबद्दल जनजागृती करता येते हे स्वातीने दाखवून दिलं.