धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
धुळे : हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महाविद्यालयात जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणारं यंत्र असूनही खासगी संस्थेला वर्षाकाठी लाखो रुपये देऊन कचऱ्याची विल्हवाट लावण्यात येत आहे.
हॉस्पिलटमध्ये जैविक कचऱ्याची समस्या होती. त्यामुळे २०१६-२०१७ मध्ये सुसज्ज जैविक घनकचरा भस्मीकरण यंत्र उभारण्यात आले. मात्र सुरुवातील वीज पुरवठा नसल्यामुळे यंत्र बंद ठेवण्यात आले. त्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र तरीही कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी खासगी संस्थेला हे काम देण्यात येते आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या कारभारात काही केल्या सुधारणा करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. कोरोना लागण झालेला एक रुग्ण या रुग्णालयातून आपल्या कुटूंबासह पळून गेला होता. विशेष म्हणजे या आधीही सात संशयित रुग्णालय सुरक्षेला खो देत पळून गेले होते. काही दिवसापूर्वी दोन मृदेहांची अदलाबद ही याच रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे झाली होती.
एकीकडे रुग्णावर नजर ठेवण्यात रुग्णालय कमी पडत असताना, दुसरीकडे वेळेवर कोरोना चाचणी अहवालांची माहिती मिळत नसल्याने जिल्ह्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या सोयीच्या बाबी हे रुग्णालय प्रशासन समोर आणत असल्याने सर्वसामान्यांमध्ये या रुग्णालयाच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नाची उपस्थिती केले जात आहे.