छत्रपती संभाजीनगर : '50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन' असं रॅप रचून (Rap Song) ते गाणाऱ्या राज मुंगासे (Raj Mungase) याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मुंगासेला आता अंबरनाथ पोलिसांच्या (Ambernath Police) हाती सोपवतील, असे संकेतही आव्हाड यांनी ट्विटमध्ये दिले आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी राज मुंगासे यांच्या रॅपचे ट्विट करून कौतुक केलं होतं. त्यावेळीही त्यांनी मुंगासे यांच्यावर पोलिस कारवाई करतील, अशी भीती व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाच्या युवासेना कोअर कमिटीच्या सदस्य असलेल्या स्नेहल कांबळे यांनी या रॅपविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून मुंगासे याच्याविरोधात अंबरनाथमध्ये  बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  सरकार विरुद्ध बदनामीकारक रॅप केलं असल्याचा आरोप कांबळे यांनी तक्रारीत केला आहे. हा रॅपर मूळचा छत्रपती संभाजीनगरचा (Chatrapati Sambhajinagar) आहे.


पन्नास खोके, एकदम ओके
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत (Shivsena) मोठं बंड केलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. पण शिंदे आणि चाळीस आमदारांवर 50 खोके घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि पुढे 50 खोके, एकदम ओके हे वाक्य राज्याच्या राजकारणात चांगलंच गाजलं. अधिवेशन काळातही विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणा देत अधिवेशन दणाणून सोडलं. 


पन्नास खोकेवर रॅप साँग
50 खोके, एकदम ओके या शब्दांचा वापर करत राज मुंगासे यांनी एक रॅप साँग तयार केलं. '50 खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन'  असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. त्यानंतर मुंगासे  विरोधात अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


विरोधकांनी शेअर केलं गाणं
राज मुंगासे याचं गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही याची दखल घेतली. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज मुंगासे याचं रॅप साँग आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केलं होतं, यावर लय भारी अशी कमेंटही केली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत कलाकराला सलाम असं म्हटलं होतं.