अखेर राज्य शासनाकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाविषयी महत्त्वाचा निर्णय
छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी अतुलनीय योगदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे भव्य दिव्य असे स्मारक उभारण्यात येणार आहे.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात या स्मारकाच्या उभारणीबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच या स्मारकाच्या उभारणीच्या कामाला त्यांनी मंजुरीही दिली आहे.
या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात येणार आहे. तसेच, या स्मारकाचे काम करताना आधी स्थानिकांशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यात यावे अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाला ‘हेरिटेज’ टच असावा. स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तूरचनांचा आधार घ्यावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन स्वरुपात करण्यात यावे, असे पवार यावेळी म्हणाले.